माणूसपण दाखविणारी – विशाल परशुराम मुळे

माणूसपण दाखविणारी – विशाल परशुराम मुळे

लाल झालेल्या सिग्नलवर
गाडी मी थांबविली ।
थांबताच माझी गाडी
अचानक ती दिसली ॥

चेहरा तिचा कोमल
रुमाल ती सावरत ।
झाडू हातात घेऊन
गार थंडीने कुडकुडत ॥

गाडीच्या माझ्या मी
काचा बंद करून होतो ।
जॅकेट अंगात असूनसुद्धा
थंडीने कुडकुडत होतो ॥

रोडवरील सारा कचरा
झाडूने ती झाडत होती ।
गाडी अचानक आल्यावर
घाबरून बाजूला जात होती ॥

सात आठ वर्षांची ती
काळ्या सावळ्या रंगाची ।
पर्वा नाही वाटत तिला
इतक्या गार थंडीची ॥

झाडून तिचं झाल्यावर
प्रत्येक गाडीजवळ आली ।
गाडीची काच वाजवून
काहीतरी बोलू लागली ॥

बोलणं तिचं ऐकायला
कुणाची तयारी नाही झाली ।
निरागस त्या परिसाठी
एकही काच नाही उघडली ॥

वाजवीत प्रत्येक काच ती
माझ्या गाडीजवळ आली ।
निरागस चेहऱ्याने तिने
नाष्ट्यासाठी विनंती केली ॥

नोट तिला देताना
मलाही बरं वाटलं ।
माझ्या एका नोटेने
तिचं गोड हास्य दाखवील ॥

एका नोटेची किंमत
मला तेंव्हा कळली ।
प्रत्येक नोटेत मला
ती छोटी दिसली ॥

छोट्या भेटीत तीने
खूप काही शिकविलं ।
माझ्यातल्या माणसाला
माणूसपण दाखविलं ॥

Vishal Muleविशाल परशुराम मुळे

1+

Leave a Reply

Create AccountLog In Your Account